आठवणीतले लोकशाहीर विठ्ठल उमप दादा !
....आणि 'दादा' गेले ते कायमचेच !
साल २०१० असेल, माझ्या दोन वर्षांच्या संशोधनातून मी निर्मिती करीत असलेला रेल्वेतील 'गँगमन' कामगारांवर मी करीत असलेल्या माहितीपटासाठी मला शीर्षक गीत लोकशाहीर दिवंगत विठ्ठल उमप दादा यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे होते. माझे वडील दि.एस आर पगारे (पत्रकार - सुशील चांदोरीकर) हे मध्ये रेल्वेच्या लेखा विभागात कार्यरत असताना मध्य रेल्वे साहित्य मंडळाद्वारे 'रेलप्रभा' हे रेल्वे कर्मचाऱ्यांचे नियतकालिन मासिक प्रकाशित करत असत.ज्यात रेल्वेसेवेत कार्यरत जेष्ठय साहित्यिक कथाकार वामन ओव्हाळ,दया पवार, ज्येष्ठय कवयित्री हिरा बनसोडे, माधवराव भिडे तसेच अन्य साहित्यिक यांचे लेख,कथा,कविता इ. साहित्य प्रकाशित व्हायचे, अश्याच एका 'रेलप्रभा' मासिकात माझ्या वडिलांचे मध्य रेल्वेतील सहकारी श्री.चंद्रकांत कुलकर्णी (चीफ कामर्शिअल मॅनेजर,कमर्शिअल ऑफिस,मुंबई) यांनी 'रेलप्रभा' या मासिकासाठी लिहून प्रकाशित झालेली त्यांची 'कर्मयोगी' ही कविता कळायला लागलं तेव्हाच वडिलांच्या कागदपत्रांतून काढून वेगळी काढून ठेवली होती. पुढे कर्मधर्म संयोगाने आय आय टी मुंबई येथे कार्यरत असताना जेव्हा मी माहितीपट करायचं निश्चित केल तेव्हा ही कविता पुन्हा हाती घेतली आणि तिचा 'शीर्षक गीत' करण्याचा वडिलांचा आणि माझा एक विचार झाला. मी वडिलांजवळ एकचं अट घातली की ह्या कवितेचं जर आपण गाणं करणार असू तर केवळ आणि केवळ लोकशाहीर विठ्ठल दादांच्या आवाजात करू बस्स ! त्याआधी किंवा तोपर्यंत माझ्या वडिलांचा आणि माझा, दि. विठ्ठल उमप दादांशी काही एक ओळखीचा असा संबंध नव्हता. पण 'मुलाची इच्छा पूर्ण नाही करणार तो बाप कुठला' या विचारानेच माझ्या वडिलांनी मला आश्वासन दिले की आपण प्रयत्न करूयात नक्कीच...आणि मग आम्हां दोघा बाप लेकाचा प्रवास सुरु झाला तो विठ्ठल उमप दादांच्या गाठी भेटीचा...आणि अखेरीस ते शक्य झाले ते माझ्या वडिलांचे मध्य रेल्वेत तिकीट तपासनीस (टीसी) पदावर कार्यरत आणि सामाजिक चळवळीतील सहकारी मित्र आयु.निकाळे काका यांच्या सहकार्याने,त्यांनी एकेदिवशी आम्हां बाप लेकाला कन्नमवार नगर येथे त्यांच्या राहत्या घरी बोलावले. त्याप्रमाणे आम्ही गेलो,चहापाणी आणि महितीपटविषयी चर्चा झाल्यावर अखेरीस त्यांनी लेबर कोर्टाच्या मागील २४२ नं च्या बिल्डिंग मधील तळ मजल्यावरील दादांच्या घरी नेलं,आणि समोर साक्षात ७९ वयवर्षे असलेल्या एका सर्वश्रेष्ठ फणकार जगविख्यात व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप दादांच दर्शन झाले. ती पहिली भेट सुमारे पाच तास चालली,त्यात दादांनी त्यांचा सर्व जीवनप्रवास (लहानपण-गायन प्रवास आणि त्यांच्या वडिलांच्या मध्य रेल्वेच्या ओ.एच.इ विभागात असतानाच्या आठवणी आणि अनेक किस्से जे त्यांच्या 'फु बाई फु' या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहेत ते ऐकवले,जे मला आणि अमोलला कॅमेरामध्ये रेकॉर्ड करून घेता आले. त्याच दरम्यान मी दादांच्या हातात हळूच नियोजित कविता दिली आणि त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आवाजात हे गाणं व्हावं ही विनंती केली. आणि त्यांनीही रेल्वे कर्मचाऱ्यांशी त्यांचे असलेले ऋणानुबंध आणि आठवणीमुळे हे गाणं गाण्याचं 'हो' म्हणून स्वीकार केला.
पुढील काही महिने (साधारणतः ४ महिने) दादा आणि माझ्यात इतके सुंदर मैत्रीचे बंध गुंफले की, दररोज एकमेकांना भेटू लागलो, दररोज मी सायंकाळी चार वाजता माझ्या आय आय टी पवई येथील ऑफिस मधून निघून सायं ५:१५ वा कन्नमवार नगर येथे दादांच्या घरी दादांसोबत एकत्र चहा घ्यायला पोहचायचो. अनेक दिवस अनेक महिने ह्या गाठी भेटी चालू राहिल्या...कधी कधी तर चक्क दादा मला सोडवायला विक्रोळी स्टेशन पर्यंत यायचे तिथे त्यांच्या एका मित्राचे हॉटेल असायचे, दादा मला तिथे चहा नाश्तासाठी न्यायचे , मी चहा घेताना दादा बटाटा भजी मागवत...नंतर एक दिवस असंच दादांनी सांगितले की मला बटाटा भजी खूप आवडतात पण माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे डॉक्टर आणि आई ( वत्सला आई) मला मनाई करतात म्हणून मी तुझ्यासोबत येतो आणि थट्टेन मला सांगत की प्लिज हे तू घरी सांगू नकोस...नाहीतर मला बटाटा भजी पुन्हा खाता येणार नाहीत. आणि मग हॉटेलच्या बाहेर पडल्यावर ते माझ्या खांद्यावर हाथ ठेवून चालत,ते क्षण माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडले असायचे...मी तेव्हा दादांपेक्षा वयाने अनुभवाने इतक्या लहान वयात होतो तरी दादा मला इतकं प्रेम करायचे. रस्त्यावर चालणारे आजूबाजूचे दादांना भेटत,शुभेच्छा-सदिच्छा देत,विचारपूस करीत,रामराम-नमस्कार करायचे आणि हळूच माझ्याकडे (हा कोण आहे एवढा मोठा) या नजरेने बघायचे. आणि ते क्षण आनंदाने - गर्वाने माझी छाती फुलवायचे...रात्री घरी आल्यावर मी हे आई-वडिलांना संगीतल्यावर त्यांनाही खूप आनंद व्हायचा.
असे अनेक प्रसंग आहेत,आठवणी आहेत दादांच्या...दरम्यान आमच्यात इतकं छान मैत्रीचं नात झालं की, दादा त्यांनी लिहलेल्या गजल,कव्वाली,बुद्धगीते,कोळीगीते नेहमी वाचून दाखवीत.... माझ्याशी त्यांनी त्यांच्या मनातील अत्यंत आवड असलेल्या त्यांच्या कविता शेयर केल्या,खासकरून पावसाळी कविता...दादांना पाऊस खूप आवडायचा...
ते सांगायचे की बाहेर पाऊस चालू झाला की मी रात्रीतून उठून खिडकीजवळ येऊन बसतो आणि बाहेरच्या पावसाशी एकरूप होतो,माझी सारी अंतर्बाह्य व्यक्तता मी पावसा जवळ 'कवितेतून' व्यक्त करतो... दादांच्या हृदयातील पाऊस मी खूप जवळून अनुभवत होतो...
साधारणतः २६-२७ जुलै २०१० रोजी मागील सहा महिन्यांपासून माझ्या आणि पप्पांच्या प्रार्थनेला यश आलं आणि प्रवीणने चालबद्ध आणि नितीनने संगीतबद्ध केलेलं 'फैलवाला' हे शीर्षक गीत दादांच्या आवाजात विधी व्हॉइस स्टुडिओ, लोअर परेल येथे श्री.श्रीकृष्ण सावंत साहेब यांनी रेकॉर्ड केलं. नंतर या फिल्म्सचे मध्य रेल्वेच्या अनेक विभागात मुंबई, पुणे, भुसावळ,लोणावळा,इगतपुरी, झेडटीएस (झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट), इरकेन पुणे, अश्या एकूण ३० पेक्षा जास्त ठिकाणी आणि कामगार मेळाव्यात स्क्रिनिंग झाले. त्यात 'रुळासंगे रुळलेला,खिळ्यासंगे खिळलेला' या गाण्यात लोकशाहीर विठ्ठल उमप दादांच्या आवाजात हजारो गँगमन कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार ठरलं...आजही हे गाणं ऐकलं की रेल्वे कामगार रडतात आणि मनोमनी दादांचे आभार व्यक्त करून श्रद्धांजली वाहतात.
गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतरही सतत दादांकडे भेटीगाठी साठी येणे जाणे चालूच होते.
२६ नोव्हेंबर २०१० ला दादांना एका नव्याने प्रसारित होणाऱ्या 'लॉर्ड बुद्धा टीव्ही' चे उदघाटनाचे आमंत्रण आले, दरम्यान दादांची तब्येत काहीशी खालावली होती,मध्यंतरी ते काही दिवस ऍडमिट देखील होते. पण घरी सोडताना डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम आणि काही दिवस गाणं गाण्यास मनाई केली होती. पण वरील आमंत्रण आल्यावर दादांनी ही सगळी सक्ती बाजूला केली आणि कार्यक्रमास जाण्याचे ठरविले...२४ नोव्हेंबर २०१० संध्याकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस नंतर त्यांच्या घरी आमची भेट झाली...दादांनी डॉक्टरांच्या सूचना सांगितल्या...त्याप्रमाणे मी देखील लहान तोंडी मोठा घास घेत त्यांना आदराने आराम करा,तब्येत सांभाळा सांगितलं आणि रात्री घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी कळले दादा नागपूरला कार्यक्रमास गेलेच...आणि २६ नोव्हेंबर २०१० ला दादांच्या निधनाचा दुर्दैवी निरोप आला, दादा स्टेजवर येताच भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करून उपस्थित भिक्षूंना वंदन करून उपस्थित लाखो अनुसायांसमोर 'जयभीम' 'नमो बुद्धाय' म्हणतच स्टेजवर खाली कोसळले आणि जागीच त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले.
या बातमीने मन सुन्न झाले.सगळीकडे दुःख शोक पसरला...आणि दादा गेले ते कायमचेच !
दादा कायम म्हणत असलेल्या त्यांच्याच ओळी आठवल्या आणि कलाकाराचे इच्छा मरण हे इतके खरे असते की निसर्ग ही त्यांना आशीर्वाद देतो आणि इच्छापुर्ती करतो याचा अनुभव आला...
दादांच्या त्या ओळी पुढील प्रमाणे....
"रसिक मायबापा तुला भेटावं,
जाता जाता एव्हढच सांगावं.
गाता गाता मज मरण यावं,
माझं गाणं मरणानेही ऐकावं"
©® सचिन सुशील
Comments
Post a Comment